छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील बीड बायपास भागातील रेणुका माता मंदिर रोडवरील गुरुप्रसाद ज्वेलर्समध्ये दोन चोरट्यांनी बंदुकीच्या धाकाने तब्बल १२ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना १९ नोव्हेंबरला रात्री १० च्या सुमारास घडली होती. वेबसिरिज पाहून चौघांनी ही लूट केल्याचे समोर आले असून, त्यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. लुटीआधी त्यांनी पाच दिवस रेकीही केली होती, असे समोर आले आहे.
कार्तिक ऊर्फ रवी सुभाष तावडे (वय २५, रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर), संदीप उमाकांत घोडेराव (वय १९), राहुल जय शिरसाठ (वय १९, दोघेही रा. जयभवानीनगर), अनुकूल अनिल पवार (२४, रा. मूर्तिजापूर, मुकुंदवाडी परिसर) अशी लुटारूंची नावे समोर आहेत. मुख्य सूत्रधार लकी सुभाष तावडे अद्याप फरारी आहे. या प्रकरणात सुरेश बाबुराव कुलते (वय ४८, रा. उमानगर हरी साई पार्क रोड, चाटे स्कूलजवळ बीड बायपास सातारा परिसर छत्रपती) यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांची गुरु प्रसाद ज्वेलर्स ही सोने-चांदीची दुकान आहे.

१९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पत्नीने नेहमीप्रमाणे दुकान उघडून दिवसभर व्यवसाय केला. त्यांची दुसरी दुकान वडगाव कोल्हाटी येथे असून, ती दुकान बंद करून कुलते हे सायंकाळी पाचला बीड बायपासच्या दुकानावर आले होते. दुसऱ्या दुकानातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम एका बॅगमध्ये टाकून आणलेली होती. ही बॅग काऊंटरवर ठेवून ते दुकान बंद करत अचानक दोन चोरटे दुकानात शिरले. काही कळण्याच्या आत त्यांनी कुलते यांना पिस्तुलीचा धाक दाखवून काऊंटरवर असलेली बॅग घेऊन काही सेकंदांत पळून गेले. महिनाभर तपास केल्यानंतर सातारा पोलिसांनी लुटारूंना अटक केली आहे. सुरुवातीला अनुकूलला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर अन्य तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, कार्तिकच्या घरातून पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
लकी मुख्य सूत्रधार पैसे, दागिनेही त्याच्याकडेच?
कार्तिकचा भाऊ लकी या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असून, तो अद्याप फरारी आहे. कार्तिकच्या वडिलांचे जयभवानीनगरात गॅरेज आहे. त्याच्या घराच्या झाडाझडतीत काहीही हाती लागले नाही. त्याची आईदेखील मिळून न आल्याने या प्रकरणात तिचाही सहभाग असल्याचा संशय आहे. लकी, कार्तिकविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिस्तूल रोखून लुटण्याची जबाबदारी लकीने दिल्लीच्या दोन शार्पशूटर मित्रांना दिली होती. लुटलेले दागिने, पैसेही लकीकडेच असल्याचा दावाही अटकेतील लुटारूंनी केला आहे. त्यामुळे लकीला अटक केल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. लकीने संदीप, राहुलला रेकीसाठी दहा हजार देण्याचे आमिष दाखवले होते. अनुकूल हादेखील गुन्हेगार अक्षय वाहूळचा साडू आहे.
लुटून नेलेला ऐवज…
७७ हजार ६२० रुपयांचे सोन्यांचे गंठण, १ लाख ४४ हजार ४५४ रुपयांचे मंगळसूत्र जोड, १ लाख ९५ हजार २८५ रुपयांच्या १२ फॅन्सी टॉप्स इअरिंग, १ लाख ९८ हजार रुपयांचे ९ पदके, १ लाख २८ हजार ३१० रुपयांचे २० नग हुजूर, ७२ हजार ६१५ रुपयांचे १५ नग कुडकं, ९९ हजार १९३ रुपयांच्या ७ लेडीज रिंग, १८ हजार रुपये किंमतीचे ८ नग अंगठ्या, ६७ हजार ६८० रुपयांचे १५ नग ओम पान, ४५ हजार २८४ रुपयांचे झुंबड जोड, ५९ हजार ५९५ रुपयांचे सोना मोड मिक्स, ५७ हजार रुपये रोख असा एकूण ११ लाख ६४ हजार ७१६ रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटण्यात आली होती.