पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : पुण्यावरून लग्नाचे वऱ्हाड घेऊन महाडला निघालेली खासगी प्रवासी बस पुणे-दिघी महामार्गावरील ताम्हिणी घाटात (जि. पुणे) उलटली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, २७ जण जखमी झाले आहेत. यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोंडेथर गावच्या हद्दीत वॉटरफॉल पॉईंटजवळील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात आज, २० डिसेंबरला सकाळी दहाच्या सुमारास घडला.
पुण्यातून जाधव कुटुंबीय महाड येथील बिरवाडीकडे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन purple ट्रॅव्हल्सच्या बसने (एमएच १४ जीयू ३४०५) येत होते. अपघात इतका भयंकर होता की, बसखाली चिरडून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव आणि अनोळखी पुरुष यांचा मृतांत समावेश आहे. जखमींना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ताम्हिणी घाट हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो.