रायगड (सीएससीएन वृत्तसेवा) : रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शैक्षणिक सहलीमधील एक विद्यार्थिनी प्रियकरासोबत गडावरूनच पळून गेली आहे. महाड तालुका पोलिसांनी प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एका शाळेची ही सहल आहे.
रायगडावरून उतरल्यानंतर एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास झाले. या विद्यार्थिनीने सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे व्हा, मी मागून येते, असे सांगितले होते. एक विद्यार्थिनी कमी असल्याचे निदर्शनास येताच शिक्षकांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस शोधत असताना खर्डी गावाजवळ ही विद्यार्थिनी एका तरुणाबरोबर दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले.
जामनेर येथील १९ वर्षीय तेजस पाटील या प्रियकराबरोबर ती विद्यार्थिनी गेली असल्याचे स्पष्ट झाले. तेजस सहलीबरोबरच जामनेर येथून बसचा पाठलाग करत किल्ले रायगडपर्यंत आला होता. चित्त दरवाजा येथून त्या विद्यार्थिनीला सोबत घेऊन तेजस पुण्याच्या दिशेने जात असताना मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. महाड तालुका पोलिसांनी तेजस पाटीलविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.