नवी मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : पन्नाशीतील विद्यार्थी प्राध्यापिकेवर घायाळ झाला आहे. त्याने चक्क तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तो वकिलीचे शिक्षण घेत असून चक्क ५० वर्षांचा आहे, तर प्राध्यापिका ३५ वर्षांची आहे. प्राध्यापिकेने त्याला सुनावल्यानंतर त्याने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वैतागलेल्या प्राध्यापिकेने पोलिसांत तक्रार केली. आता त्या पन्नाशीतल्या विद्यार्थ्यावर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या नेरूळ परिसरातील महाविद्यालयात हा ५० वर्षीय विद्यार्थी लॉचे शिक्षण घेतो. तो अंबरनाथ येथे राहतो. कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येताना त्याचा प्राध्यापिकेवरच जीव जडला. त्याने थेट तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. अंबरनाथ येथील एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने पैशांच्या जोरावर त्याने प्राध्यापिकेवर प्रभाव पाडण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्राध्यापिकेने त्याला नकार देत सुनावले. त्यामुळे त्याने दोन सहकाऱ्यांना हाताशी धरून प्राध्यापिकेच्या विरोधात खोट्या तक्रारी करून बदनामी करण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित प्राध्यापिकेने नेरूळ पोलिसांत तक्रार केली. चौकशीअंती या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र चौकशीसाठी बोलावूनही हा पन्नाशीतील विद्यार्थी येत नसल्याचे समजते.