छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चोरट्यांनी आपला मोर्चा आता लग्नसमारंभांकडे वळवला आहे. इसारवाडी फाट्याजवळील गोविंद लॉन्समोरून लग्नातून एकाचा लॅपटॉप त्यांनी चोरून नेला आहे. शहरातून दोन दुचाकींची चोरीही समोर आली आहे.
दत्तात्रय पाराजी हरकळ (वय ३३, रा. समृद्धी पार्क रो हाऊस, बीड बायपास) हे गोविंद लॉन्सवरील मित्राच्या लग्नाला गुरुवारी (५ डिसेंबर) रात्री गेले होते. कारमध्ये त्यांनी कंपनीने दिलेला लॅपटॉप ठेवलेला होता. तो चोरट्यांनी चोरून नेला. त्यांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार कारभारी देवरे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सचिन नागोराव खाडे (वय २७, रा. विठ्ठलनगर, सिडको) यांनी त्यांची दुचाकी बुधवारी (४ डिसेंबर) दुपारी एन १ पोलीस चौकीजवळ उभी केली होती. तिथून चोरट्यांनी चोरून नेली. खाडे यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार भिमसिंग सोनवणे करत आहेत. खाडे हे एअरटेल कंपनीत सेल्समन आहेत. ते एन १ मध्ये ग्राहकाचे इंटरेनक्शन कनेक्शन दुरुस्तीसाठी आले होते.
तिसऱ्या घटनेत ॲड. तालिब अजीज शेख (वय ३१, रा. नारायणपूर, ता. गंगापूर) यांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की त्यांच्या घरासमोर उभी केलेली त्यांची स्कुटर चोरट्यांनी २ डिसेंबरच्या रात्री चोरून नेली. ३ डिसेंबरला सकाळी ही बाब समोर आली. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार भिमराव शेळके करत आहेत.