छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अपेक्षेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आता कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्रिपदे मिळणार, यावर खल सुरू आहे. जिल्ह्याला यापूर्वी सरकारमध्ये ३ मंत्रिपदे होती. आताही तीनच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. मात्र अब्दुल सत्तार यांना भाजपचा विरोध असल्याने त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यांच्याऐवजी संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिले जाईल आणि भाजपचे अतुल सावे आणि प्रशांत बंब हे मंत्री होतील, अशी दाट शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे हे ३ मंत्री यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये होते. नंतरच्या काळात भुमरे हे खासदार झाल्याने त्यांचे पालकमंत्रीपद सत्तारांकडे आले. आताच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिले जाईल, याची शक्यता अगदीच कमी दिसून येत आहे. कारण भाजपचा ठाम विरोध आहे. महायुती सरकार निवडून आल्यापासून भाजपने जे निर्णय घेतले, ते शिंदे गटाने मान्य केले आहेत. त्यामुळे सत्तारांच्या मंत्रिपदाला केलेला विरोधही शिंदे गटाला मान्य करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
संजय शिरसाट यांची दावेदारी मात्र भरभक्कम दिसून येत आहे. गेल्यावेळी त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश होईल असे सांगण्यात येत होते. अखेरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अखेर सिडकोचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी सुरुवातीपासून शिंदे गटाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे याही वेळी त्यांना मंत्रिपदावरून डावलले तर कार्यकर्त्यांत चुकीचा संदेश जाऊ शकतो. पुढे महापालिका निवडणुकीतील शिंदे गटाच्या कामगिरीवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शिरसाट यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी दाट शक्यता आहे.
अतुल सावेंची कामगिरी चांगली राहिली आहे. फडणवीस त्यांच्याबद्दल सकारात्मक राहिले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद याही वेळी दिले जाईलच, पण भाजपकडून यावेळी प्रशांत बंब यांचेही नाव प्राधान्यक्रमाने चर्चेत आले आहे. फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक यावेळी त्यांना मंत्री बनवू शकते. विशेष म्हणजे, निवडणुकीत त्यांच्यासमोर इतकी आव्हाने असूनही आणि खुद्द शरद पवारांनी सभा घेऊनही बंब यांनी विजयी पताका फडकवली. मतदारसंघात बंब यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या. तरीही शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे, मराठा समाजाची मते बंब यांना भरभरून पडली आहेत. विकासकामांच्या जोरावर त्यांनी मिळवलेला हा विजय त्यांना मंत्रिपदापर्यंत नेणारा ठरला आहे.
पालकमंत्री कोण होणार?
जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याबद्दलही सध्या उत्सुकता ताणली गेली आहे. संदिपान भुमरे यांच्यानंतर औटघटकेचे का होईना अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्रीपद भूषवले. आता पालकमंत्री कुणाकडे जाणार, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाने पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. आ. संजय शिरसाट यांनी मी मंत्री होणार आणि पालकमंत्रीपदही माझ्याकडेच येणार, असे ठामपणे सांगितले. त्यामुळे शिंदे गटाकडे पालकमंत्री राहिले तर शिरसाट यांना पालकमंत्रीपद दिले जाणार का आणि भाजपकडे गेले तर कोणाकडे पालकमंत्रीपद येणार, याची उत्सुकता आहे. भाजपचा पालकमंत्री झाला तर अतुल सावे यांच्याकडेही हे पद येऊ शकते, अशी चर्चा आहे.