फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बळी गेला आहे. शेतात शेळ्या चारत असताना तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श होऊन लक्ष्मण काळू म्हस्के (वय ६४, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) यांचा जागीच मृत्यू झाला. एका शेळीही विजेचा धक्का बसून दगावली. ही घटना वडोद बाजार शिवारात शुक्रवारी (६ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
लक्ष्मण म्हस्के शेतीसोबत शेळीपालन करतात. नेहमीप्रमाणे ते १५ शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या गिरीजा नदीच्या काठावर गेले होते. त्या ठिकाणी विद्युत प्रवाहित तारा तुटून पडलेल्या आहेत. एका शेळीला या तारांचा स्पर्श होऊन ती जागीच दगावली. शेळीला अचानक काय झाले हे पहायला गेलेल्या लक्ष्मण यांनी शेळीला स्पर्श करताच तेसुद्धा तारेला चिकटले. त्यांचाही जागीच मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या घरी आल्या. मात्र लक्ष्मण म्हस्के न दिसल्याने कुटुंबीयांनी गाव शिवारात शोध सुरू केला. विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
पाथ्री येथील महावितरण कार्यालयाला कळवल्यानंतर विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर म्हस्के यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रात्री आठला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे महाविरणाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. वडोदबाजार येथील स्मशानभूमीपासून काही अंतरावरील शेतवस्तीवर या विद्युत तारेद्वारे वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी पहाटे वादळवाऱ्यासह पावसामुळे या तारा तुटून पडल्याचे सांगण्यात आले. वेळीच महावितरणने धाव घेऊन दुरुस्ती केली असती तर लक्ष्मण म्हस्के यांचे प्राण गेले नसते, अशा भावना व्यक्त होत आहेत.