छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उन्नत शेतकरी गटातील शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति कुटुंब सदस्य १७० रुपये अनुदान देण्याची पुरवठा विभागाची योजना आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ही योजना राबविली जाते. तथापि, जिल्ह्यातील ३१ हजार ६१४ शेतकऱ्यांचे अनुदान वितरण बँक खाते तपशिल उपलब्ध न करून दिल्यामुळे प्रलंबित आहे. हे अनुदान वितरणातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून डिसेंबरअखेर अनुदान वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत.
अनुदान वितरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बँक खात्याचे तपशिल नसणे, तसेच आधार संलग्निकरण नसणे या दोन प्रमुख तांत्रिक अडचणी असून शेतकऱ्यांनी ३० डिसेंबरपर्यंत आपले आधार संलग्निकरण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागाची बैठक शुक्रवारी (६ डिसेंबर) घेण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यासह सर्व तालुकास्तरीय अधिकारी, पुरवठा निरीक्षक, अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उन्नत शेतकरी गटातील (एपीएल फार्मर) ३१ हजार ६१४ शेतकऱ्यांचे अनुदान वितरण प्रलंबित आहे. हे अनुदान शिधापत्रिकेवरील प्रति सदस्य १७० रुपये प्रमाणे दरमहा दिले जाते. तथापि, त्यासाठी बँक खाते तपशिल व आधार संलग्निकरण असणे आवश्यक आहे. अद्याप १७ हजार लाभार्थ्यांचे आधार संलग्निकरण प्रलंबित आहे. ३१ हजार ६१४ जणांचे बँक खाते तपशिल नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच आतापर्यंत २५ हजार ७८६ शिधापत्रिका धारकांना २५ कोटी ३९ लक्ष रुपयांचा लाभ मार्च अखेर वितरीत झाला आहे.
शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण, बँक तपशिल गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत अन्य योजनांसाठीही आधार संलग्निकरण, ई- केवायसी याबाबतचा आढावा घेण्यात आला. स्वस्त धान्य दुकानातील अन्न धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्यांचे ई- केवायसी करण्याची मोहीमही राबवावी. शिधापत्रिकेसोबत कुटुंबप्रमुखाच्या मोबाईल क्रमांकाचे संलग्निकरण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.