छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यालगत सुरू आहे. हे काम प्रगतिपथावर आहे. सद्यस्थितीत या मार्गावरील चितेगाव येथे काम सुरू करायचे असल्याने रहदारीमुळे या कामात व कामामुळे रहदारीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चितेगाव येथून जाणारी जड व हलक्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत. हे बदल १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कामाच्या अनुषंगाने करण्यात आले असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
बदल करण्यात आलेला जड वाहनांचा मार्ग
छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर- वाळूज- ईमामपूरवाडी- रांजणगाव- शेकटामार्गे बिडकीन व पुढे पैठणकडे जातील.
पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने पैठण- बिडकीन-शेकटा- रांजणगाव-ईमामपूरवाडी-वाळूजमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.
तसेच छत्रपती संभाजीनगरकडून पैठणकडे जाणारी वाहने- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२-कचनेर कमान- कचनेर- पोरगाव चौफुली- निजलगाव- बिडकीन-मार्गे पैठणकडे जातील.
पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने- पैठण- बिडकीन- निलजगाव- पोरगाव चौफुली- कचनेर-कचनेर कमान- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.