सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉल आल्याने व्यापारी मोबाइलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून चोरट्याने दुचाकीला लटकवलेली अडीच लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमधील कॅनरा बँकेसमोर घडली.
व्यापारी अजय गाढेकर (रा. वरुडपिंप्री, ता. सिल्लोड) कॅनरा बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून २ लाख ५९ हजार रुपये काढून ९ हजार खिशात तर २ लाख ५० हजार रुपये बॅगेत ठेवून ते बँकेबाहेर आले. पैशांची बॅग दुचाकीला लटकवली. याचवेळी त्यांना कॉल आला. मोबाइलवर बोलण्यात ते व्यस्त असल्याचे हेरून चोरट्याने त्यांची नजर चुकवून पैशांची बॅग घेऊन धूम ठोकली.
कॉलवर बोलणे झाल्यावर गाढेकर यांनी दुचाकीकडे पाहिले तर बॅग नव्हती. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन खातरजमा केली. गाढेकर यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात चोरटा कैद झाला आहे. पोलीस आता त्याला शोधत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.