छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : क्षुल्लक कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने मामा-भाचावर सशस्त्र हल्ला चढवून मामाची हत्या केल्याची घटना मिसारवाडीत गुरुवारी (५ डिसेंबर) घडली होती. सिडको पोलिसांनी ५ मारेकऱ्यांची ओळख पटवली असून, त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. चौघे फरारी झाले असून, त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
खून करणाऱ्या आरोपींमध्ये अनिल मारोती मकळे (वय २५), बंटी रगडे (वय २३), सतीश ढोबळे (वय ३०), राहुल रगडे (वय २९), शुभम सातदिवे (वय ३२, सर्व रा. मिसारवाडी) यांचा समावेश आहे. आरोपींपैकी अनिल मळके याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. विकास ज्ञानदेव खळगे (वय ३१, रा. मिसारवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा भाचा गौतम राजू जाधव (वय २१, रा. मिसारवाडी) गंभीर जखमी आहे.
या प्रकरणात बाबासाहेब ज्ञानदेव खळगे (वय ४०, रा. मिसारवाडी, गल्ली क्र. १०) यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते आई सुमनबाई आणि तीन भाऊ प्रकाश, विकास आणि भय्यासाहेब यांच्यासह राहतात. विकास आणि मारेकरी एकाच गल्लीत राहणारे आहेत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बाबासाहेब कामावरून घरी आले. शेजारी राहणाऱ्या ढोबळेबाई धावत आल्या. तुझा भाऊ विकास हा माझा मुलगा सतीशला शिवीगाळ करत आहे. तू लगेच चल नाही तर त्यांच्यात भांडण होईल, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे बाबासाहेब हे सनी सेंटरच्या मागच्या मैदानावर धावत गेले. तिथे बंटी रगडेच्या हातात चाकू, सतीशच्या हातात तलवार तर शुभम सातदिवेच्या हातात कुऱ्हाड होती. विकासवर त्यांनी आडवे तिडवे वार केल्याचे दिसले. आज याला जिवंत सोडायचे नाही, असे बंटी व राहुल ओरडत होते. विकास रक्तबंबाळ होऊन पडलेला होता. तोपर्यंत बाबासाहेब आणि त्यांचे अन्य भाऊही धावत आले. गर्दी पाहून मारेकरी तिथून पळून गेले. अनिल मळके याला पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, श्री. शेवाळे, पोलीस अंमलदार महेश सोनावणे, देवा सावंत यांच्या पथकाने अटक केली.