कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव ट्रकने दाम्पत्याच्या स्कुटीला उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर- नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी येथील वेळगंगा नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (६ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. महिलेला ट्रकने ५० फुटांपर्यंत फरपटत नेल्याचे नागरिकांनी सांगितले.
उज्ज्वला अशोक थोरात (वय ३८, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती अशोक थोरात (वय ४२) गंभीर जखमी झाले आहेत. अशोक देवगाव रंगारीत गॅस वेल्डिंगचा व्यवसाय करतात. पती-पत्नी स्कुटीने (क्र. एमएच १२ जीजे ९२२८) कनक सागज (ता. वैजापूर) येथील खंडोबा यात्रेला लासूरस्टेशनमार्गे जात होते. देवगाव रंगारी येथील वेळगंगा नदीच्या पुलाजवळील वळणावर आल्यानंतर मागून भरधाव आलेल्या ट्रकने (जीजे ०४ एडब्ल्यू ४४२५) त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
उज्ज्वला रस्त्यावर पडल्या. त्यानंतर ट्रकने त्यांना ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. पती, पत्नीला पोलिसांनी देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. महिलेच्या पश्चात पती, दोन, मुले, एक मुलगी, सून, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. देवगाव रंगारी पोलिसांनी ट्रकचालकासह दोघांना वाहनासह ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.