छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात वाळूज एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. सरोज अमरनाथ तिवारी (वय ३४) आणि अनिल श्रीराम कुमार (वय २४, दोघेही रा. महमुदसराय तहसील, मोहनगंज, जिल्हा अमेठी, उत्तर प्रदेश) अशी या चोरट्यांची नावे आहेत. दोघे सीसीटीव्हीत कैद झाले होते. घटनेच्या २४ तासांत त्यांना पकडण्यात आले.
बालकृष्ण पेट्रोलपंपाशेजारील मुख्य मार्गावरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून त्यातील रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न बुधवारी (४ डिसेंबर) पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) झाला होता. एटीएममधील चुकीच्या हालचाली व मशीनसोबत छेडछाड होत असल्याचे कॅमेरा सिस्टिमच्या माध्यमातून लगेच बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने बँक अधिकाऱ्यांनी लोकेशनसह तातडीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी झटपट सायरन वाजवत घटनास्थळ गाठल्याने चोरट्याने एटीएम फोडणे सोडून पळ काढला होता.
घटनेच्या आदल्या दिवशी एटीएम मशीनमध्ये १२ लाख ३९ हजार ६०० रुपयांची रोकड टाकण्यात आली होती. वाळूज परिसरात मूळ कागदपत्रांशिवाय सहज काम आणि खोली उपलब्ध होते, अशी माहिती असल्याने दोघांनी महाराष्ट्रातील वाळूज येथे येण्याचा निर्णय घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद आबूज, पोउपनिरीक्षक विलास वैष्णव, पोलीस अंमलदार बाबासाहेब काकडे, बाळासाहेब आंधळे, सुरेश भिसे, प्रशांत सोनवणे, अनिल भाले, राजाभाऊ कोल्हे यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज, तांत्रिक मदत आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही चोरट्यांना एकता नगर (रांजणगाव) येथून ताब्यात घेतले.