छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालू आठवड्यातच सलग तिसरी खुनाची घटना घडल्याने छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. टोळक्याने छातीत चाकू खुपसून आयटी अभियंत्याची हत्या केली. ही थरारक घटना आज, ६ डिसेंबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास झाल्टा फाटा येथील हॉटेल यशवंतमध्ये घडली. संतोष राजू पेड्डी (वय २८, रा. राजज्योत बिल्डिंग, उस्मानपुरा) असे हत्या झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. ३ मारेकरी असून, चिकलठाणा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे, त्यांचा तिसरा साथीदार फरारी आहे.
बी.टेक. झालेला संतोष आयटी कंपनीत कार्यरत होता. तो सध्या वर्क फ्रॉम होम करत होता. त्याचे कुटुंबीय रोपळेकर चौकाजवळ दूध डेअरी चालवतात. एका लग्नासाठी घरचे सर्व हैदराबादला गेलेले असल्याने संतोष एकटाच घरी होता. आज पहाटे तीनला काम आटोपल्यानंतर त्याला भूक लागली. त्यामुळे घराजवळील कारचालक राधेश्याम अशोक गडदे (वय २०, मूळ रा. मंठा) याला बोलावून घेत त्याच्यासोबत संतोष बीड बायपासने झाल्टा फाट्याकडे गेला. हॉटेल यशवंत सुरू असल्याने दोघे तिथे जेवायला गेले.
संतोष हॉटेलमध्ये शिरणारच तितक्यात आरडाओरड करत तिघे जण बाहेर पडत होते. त्यांना संतोष हा हॉटेल मालक असल्याचे वाटले. त्यांनी संतोषवरच हल्ला चढवला. एकाने जवळील चाकू संतोषच्या छातीत खुपसला. चाकू खोलवर गेल्याने संतोष जागीच कोसळला. त्यानंतर टोळके पळून गेले. संतोषला कारने घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फूटेज तपासून मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला. यशवंत हॉटेल हे बद्री शिंदे यांचे आहे.
संतोष येण्यापूर्वी जेवणासाठी हॉटेलमध्ये आलेल्या तिघांचे जेवण झाल्यानंतर मॅनेजरसोबत भांडण झाले होते. मॅनेजर आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करून तिघे बाहेर पडले, तितक्यात त्यांना समोर संतोष दिसला. कारमधून उतरून एवढ्या पहाटे आल्याने तो हॉटेलमालक असल्याचे टोळक्याला वाटून त्यांनी संतोषवर हल्ला चढवला. मी जेवणासाठी आलोय, हॉटेलचा मालक नाही, असे संतोषने सांगूनही टोळक्याने ऐकले नाही आणि त्याची हत्या केली. रात्री उशिरा या हत्येप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तिसरा साथीदार मात्र हाती लागलेला नाही. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. तूर्त पोलिसांनी त्यांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.