वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : १० ते १५ विद्यार्थी भरबसस्थानकावर उठबशा काढताना पाहून प्रवासीही चक्रावले… त्यांच्यासमोर उभ्या प्राध्यापकांनी त्यांना ही शिक्षा सुनावली होती… कॉलेजमध्ये ठीक आहे, पण चक्क बसस्थानकावर हा प्रकार होत असल्याने सर्वांची बोटे तोंडात गेली होती… वैजापूर तालुक्यातील शिऊर बसस्थानकावर गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला…
असं का घडलं?
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील वाकला, भादली, बाभूळतेल येथील अनेक विद्यार्थी रोज एसटी बसने ये-जा करतात. त्यातील काही १० ते १५ टवाळखोर विद्यार्थी मोठ्याने गाणे म्हणायचे, आरडाओरड करायचे, टवाळकी करायचे. त्यांना समजावून सांगण्यास गेलेल्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांनाही ते दमदाटी करायचे. इतर कोणी मध्ये पडले तर समूहाने त्यांच्या अंगावर धावून जात होते. वैतागलेल्या बसचालक-वाहकांनी ही बाब एसटीचे वाहतूक नियंत्रक सुनील साळुंके यांना सांगितली.
साळुंके यांनी संत बहिणाबाई महाविद्यालयातील प्राचार्य सानप यांना कळवले. प्राचार्यांनी ही बाब गांभीर्याने घेत कॉलेजचे वर्ग सुटल्यानंतर दोन प्राध्यापकांना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बसस्थानकात पाठवले. टवाळखोर विद्यार्थी बसस्थानकातच होते. त्यांचा नेहमीप्रमाणे धुडगूस सुरू होता. दोन्ही प्राध्यापकांनी या टवाळखोर विद्यार्थ्यांना गाठले आणि चांगलेच सुनवायला सुरुवात केली. त्यानंतर या सर्वांना उठबशा काढायला लावल्या. त्यानंतर एसटी बस चालक, वाहकांची माफी मागण्यासही सांगितले. पुन्हा असा टवाळखोरपणा करणार नाही, अशी हमी त्यांच्याकडून घेतली आणि मगच त्यांना सोडून देण्यात आले.