छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेनेच्या ठाकरे गटात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांच्यातील वाद कायम राहणार असल्याचे बुधवारी (५ डिसेंबर) अधोरेखित झाले. दोघांच्या गटबाजीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या गटबाजीला कंटाळून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेले, पण दोघांतील मनमुटाव काही मिटत नसल्याचे चित्र आहे. आता तर खैरे यांनी थेट सांगूनच टाकले, की मी मोठा नेता आहे, त्याच्यासोबत मी जुळवून घ्यावे का? एकूणच दोघांतील वर्चस्ववाद इतक्यात संपणार नसल्याचे चिन्हे आहेत.
चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी औरंगपुरा येथील शिवसेना भवनात प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी तुम्हा दोघांतील (खैरे-दानवे) वाद मिटला पाहिजे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली. त्यांना खैरेंनी लगेचच उत्तर दिले. ‘मी मोठा नेता आहे, माझे जनतेत वलय आहे. त्याच्यासोबत मी जुळवून घ्यावे काय? त्यांनी दोन पावले मागे घेतले तर मी चार घेईन, असेही खैरे म्हणाले. बैठकीला अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख राजू वैद्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघप्रमुख राजू शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
खैरे यांच्या पवित्र्यामुळे छत्रपती संभाजीनगरात इतक्या तरी दोघांतील धुसफूस कमी होणार नसल्याची जाणीव पदाधिकाऱ्यांनाही झाली. क्रांती चौक येथे बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारविरोधी आंदोलन दानवे यांच्या नेतृत्वात होणार असल्याचे जाहीर केले होते. मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू का, असा सवालही खैरे यांनी केला. काँग्रेस, शरद पवारांसोबत गेल्याने पक्षाला अपयश आल्याचे मतही या वेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेत पक्षाने स्वतंत्र वाटचाल करावी, अशी मागणीही केली. त्यावर खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तुमच्या भावना त्यांच्या कानावर टाकतो, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
वादाची परंपरा…
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वर्चस्ववादाची परंपरा दीर्घकाळापासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून हा वाद अधिकच पेटला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांनी उमेदवारी मागितली होती. त्यावरून खैरे आणि त्यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगले. उद्धव ठाकरे यांनी वाद मिटवल्यानंतर खैरे यांच्यासाठी प्रचार करण्याची तयारी दानवे यांनी दाखवली. पण प्रत्यक्षात त्यांनी काम केलेच नाही, असा आरोप खैरे यांनी पराभूत झाल्यानंतर केला होता. नंतर विधानसभा निवडणुकीही हाच वाद कायम राहिला आणि ठाकरे गटाचे सहाही उमेदवार पडले. आता महापालिका निवडणुकीची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे. या तयारीतही दोघांतील धुसफूस उफाळून येत असल्याने पक्षाचे निवडणुकीत काय होणार, या चिंतेने पदाधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.