छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातवीत शिकणाऱ्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वाळूजमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी ही घटना समोर आली. वैष्णवी सुनील गाडे (रा. मनीषानगर, वाळूज) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
वैष्णवी वाळूज परिसरातील एका शाळेत शिकत होती. तिच्या वडिलांचे सन २०१४ मध्ये निधन झाले होते, तर आईने सन २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. वैष्णवी व तिचा लहान भाऊ कृष्णा या दोघांचा सांभाळ मामा दीपक खोलसे करत होते. गुरुवारी सकाळी आजी व मावशी स्वयंपाकासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. दोन मामा व आजोबा कंपनीत कामाला गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने गळफास घेतला.
दुपारी १२ ला कृष्णा घरी आला तेव्हा वैष्णवी दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्याने मोबाइल व्हिडीओ कॅमेऱ्याच्या मदतीने दरवाजाखालून पाहिले. त्यावेळी वैष्णवीने आत्महत्या केल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी वैष्णवीला तातडीने घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. वैष्णवीची मावशी व आजी केटरिंगच्या कामासाठी दोन दिवसांपासून बाहेरगावी गेलेल्या होत्या. त्यांची आठवण येत असल्याचे वैष्णवीने भाऊ कृष्णाला सांगितले होते. भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. भूक लागल्याने तो परतल्यावर ही घटना समोर आली. विशेष म्हणजे, वैष्णवीला चांगला स्वयंपाक यायचा. तिने सकाळी दोन्ही मामांना जेवणाचा डबाही करून दिला होता. वैष्णवीच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.