छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यभर गाजलेल्या आदर्श पतसंस्थेतील २०२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील दोन गुन्ह्यांत संशयित सुनील अंबादास मानकापे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.
सुनील मानकापेवर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे दाखल असून, औरंगाबाद जिल्हा महिला आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेशी संबंधित गुन्हा आणि जय किसान जिनिंगशी संबंधित गुन्ह्यात खंडपीठाने त्याला जामीन दिला. सत्र न्यायालयात जामीन न मिळाल्याने त्याने खंडपीठात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील आरोपी मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्रसुद्धा दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आता कसलीही माहिती घेणे बाकी नाही. मानकापे कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता तपास अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. अर्जदार सुनील याच्याकडे कुठल्याही प्रकारची मालमत्ता शिल्लक नाही, असेही खंडपीठात ॲड. टोपे यांच्या वतीने सांगण्यात आले.