खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे मामाकडे आलेल्या १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून २० वर्षीय तरुणाने पळवून पंढरपूरला नेत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या युगुलाला खुलताबाद पोलिसांनी पकडून आणले आहे. मुलीची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अक्षय दगडू सोनवणे (वय २०, रा. लामणगाव, ता. खुलताबाद) असे प्रियकराचे नाव आहे.
वडगाव कोल्हाटी येथील शाळेत शिकणारी १६ वर्षीय मुलगी टाकळी राजेराय येथे मामाकडे आली होती. अक्षयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाच्या आमिषाने २७ नोव्हेंबरला फूस लावून पळवून नेले. मुलीच्या आईने खुलताबाद पोलीस ठाण्यात अक्षयविरुद्ध तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक एल. एफ. भोजने यांना दिले. त्यांनी तपास सुरू केला असता अक्षय हा मुलीला घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे गेल्याचे समोर आले.
त्यांनी लगेचच पोलीस अंमलदार रतन वारे, महिला पोलीस अंमलदार सोनाली कुंदे यांच्यासह मंगळवारी (३ डिसेंबर) पंढरपूर गाठले. अक्षयसोबत मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे या प्रकरणात अपहरणासोबतच पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयला खुलताबाद न्यायालयात हजर केले असता त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली, तर मुलीला छत्रपती संभाजीनगर बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एल. एफ. भोजने, पोलीस अंमलदार रतन वारे करत आहेत.