वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : सल्फ्युरिक ॲसिड घेऊन मुंबईहून जालन्याला जाणाऱ्या टँकरला अचानक गळती लागून हजारो लिटर केमिकल महामार्गावर पसरले. ही घटना वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील न्यू हायस्कूलजवळ बुधवारी (४ डिसेंबर) पहाटे दीडला घडली.
सकाळी नऊपर्यंत गळती सुरूच असल्याने लोकांची गर्दी जमली. वैजापूर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून अग्निशमन दलाचा बंब बोलावला. त्यानंतर सकाळी ११ वाजता टँकर हलवले. केमिकलच्या वासाने ग्रामस्थांना डोकेदुखी, डोळे जळजळ करण्याचे प्रकार घडले. उग्र वास पसरल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. टँकरची क्षमता ३० टनची होती. ८ तासांत टँकर रिकामा झाला. जुना टँकर असल्याने टाकीला खड्ड्यांचे हादरे बसून छिद्र पडले आणि गळती झाली. सल्फ्युरिक ॲसिड घातक असून, त्याचा संपर्क मानवाच्या शरीराशी आला तर शरीर जळते. जमिनीवर पडले तर जमिनी नापीक होते.