वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ४४ वर्षीय महिलेच्या घरी जात, घरात तिचा पती व मुलगा नसल्याचे पाहून गायके मामाची विकृती उफाळून आली. त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची तक्रार महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेगाव (ता. येवला, जि. नाशिक) येथील गायके मामा नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वैजापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेच्या बसवर चालक आहे.
तक्रारदार ४४ वर्षीय महिला २०२१ साली वैजापूर शहरातील एका खासगी शाळेत मावशी म्हणून काम करत होती. पगार कमी असल्याने तिने मे २०२४ रोजी ते काम सोडले. गायके मामाकडे तिने समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये मावशी म्हणून काम मिळेल का?, अशी विचारणा केली होती. त्यावेळी त्याने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले होते. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी तो महिलेच्या घरी आला. तिचा पती व मुलगा घरात नसल्याचे पाहून त्याने महिलेसोबत अश्लील चाळे केले. महिलेने वैजापूर पोलीस ठाणे गाठून गायके मामाचे कृत्य सांगितले. याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.