छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीदरम्यान १६ नोव्हेंबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास पाचोड येथील निवासस्थानी चक्कर येऊन आ. विलास भुमरे गॅलरीतून पडले होते. डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. मात्र ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथील सभेत विलास भुमरे यांना मारहाण झाल्याचे वक्तव्य केले. याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रांसह प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्या. यामुळे भुमरे यांची प्रतिमा मलीन झाल्याने बदनामी केल्याबद्दल दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ते आता अंबादास दानवे यांच्यावर ठोकणार आहेत. तशी नोटीसही त्यांनी वकिलामार्फत दानवेंना बजावली आहे.
दरम्यान, याबाबत दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली असून, मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन चौकशीची मागणी करावी, असे दानवे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी बराच वाढणार असल्याचे चित्र आहे. विलास भुमरे यांनी पत्रकारांना सांगितले, की विधानसभा निवडणुकीत माझे मताधिक्य कमी व्हावे म्हणून अंबादास दानवे प्रयत्नरत होते. त्यासाठी बेताल वक्तव्य करत होते. त्यांच्यासारख्या विरोधी पक्षनेत्यांना हे शोभत नाही. त्यामुळे मी अब्रुनुकसानीची नोटीस पाठवलेली आहे.
प्रचारासाठी नियमित सकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत व्यस्त असल्याने पुरेशी झोप मिळाली नाही. यामुळे तोल जाऊन गॅलरीतून पडलो. मात्र दानवे यांनी त्याचे भांडवल केले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. १० दिवसांत नुकसानभरपाई न दिल्यास न्यायालयात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत दानवे म्हणाले, की अशा पोकळ नोटिसा, धमक्यांना घाबरत नाही. माझ्या दाव्यावर मी आजही ठाम आहे. मी बोललो ते खोटे वाटत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. पोलीस या प्रकरणाचे सत्य शोधतील. नोटिसा, धमक्यांना मी कधीच घाबरत नाही, असेही दानवे म्हणाले.