छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन- ५ भागातील साईनगरमध्ये बुधवारी (४ डिसेंबर ) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आली. शुभमभाऊ ज्ञानेश्वर वहाटुळे (वय २१, रा. पिंपळगाव वळण, ता. फुलंब्री) असे त्याचे नाव आहे.
शुभम इलेक्ट्रिकल शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. साईनगरमध्ये किरायाने खोली घेऊन राहत होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास खोलीत त्याने गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरू व घरमालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिडको पोलिसांना कळवले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. सिडको पोलिस तपास करत आहेत. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ गावाकडून शहरात आला होता.
त्याने आईने दिलेला डबा शुभमला दिला. मला गावाकडे तुझ्या दुचाकीवरून यायचे आहे, असे त्याने भावाला सांगितले. मी शहरातील कामे आटोपून आल्यानंतर गावी जाऊ, असे सांगून मोठा भाऊ निघून गेला होता. शुभम अभ्यासात हुशार होता. शुभमचे वडील अल्पभूधारक असून, त्यांना तीन मुले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घरही बांधले नाही. शुभम शिक्षण घेत असतानाच वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामालाही जात होता.