सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : ट्रॅक्टरमधील मळणीयंत्र उलटून त्याखाली दबल्याने एका मजूर महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना केऱ्हाळा (ता. सिल्लोड) मंगळवारी (३ डिसेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली. ज्योती कैलास सुरडकर (वय ४२,रा. केऱ्हाळा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर मनीषा नंदकिशोर जाधव (रा. केऱ्हाळा) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
केऱ्हाळा शिवारातील शब्बीर रशीद पटेल यांच्या शेतातील मकाची मळणी करण्यासाठी साबेर बुढण शेख हे ट्रॅक्टरमध्ये मळणीयंत्र घेऊन जात होते. त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून मळणीयंत्र उलटले. त्या मळणी यंत्राखाली ज्योती व मनीषा बसलेल्या होत्या. त्यांच्यावर मळणीयंत्र पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच फुलंब्रीजवळ गंभीर जखमी ज्योती यांचा मृत्यू झाला. मनीषा यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दीपक नाथाजी सुरडकर यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचालक साबेर बुढण शेख याच्याविरुद्ध बुधवारी (४ डिसेंबर) दुपारी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे