छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) पदाधिकाऱ्यांच्या कारला नाशिक जिल्ह्यातील गोंदे इंटरचेंजजवळ (ता. सिन्नर) भीषण अपघात झाला. यात जिल्हाध्यक्ष सचिन सुभाष बनसोडे (रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) व त्यांचा मेहुणा प्रशांत सुनील निकाळजे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) या पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, तर चौघे पदाधिकारी जखमी झाले. ही घटना बुधवारी (४ डिसेंबर) पहाटे चारच्या सुमारास घडली.
विधानसभा निवडणूक निकालानंतर बसपाची समीक्षा बैठक मुंबईतील कार्यालयात मंगळवारी (३ डिसेंबर) घेण्यात आली. बैठकीला छत्रपती संभाजीनगरहून जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी चार वाहनांतून गेले होते. सायंकाळी बैठक संपल्यानंतर ते समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरला परत निघाले. कसारा येथे रात्री साडेदहाला त्यांनी जेवण केले. चालक शुभम दसारे थकला असल्याने बनसोडे यांनी त्याला मागे बसवले आणि ते स्वतः ड्रायव्हिंग करू लागले. गोंदे इंटरचेंजजवळ समोर असलेल्या कंटेनरने अचानक लेन बदलल्यामुळे बनसोडे यांची मारुती सुझुकी कंपनीची एक्सएल सिक्स कार (एमएच २० जीक्यू ८५१५) या कंटेनरवर (एचआर ३८ एसी ३०९५) मागून धडकली.
ही धडक इतकी जोरात होती, की कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. यात सचिन बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील प्रशांत निकाळजेंसह शुभम दसारे (वय २५, रा. पुंडलिकनगर), सचिन मनोहर साळवे (वय २५, रा. बंबाटनगर), शुभम दांडगे (वय २६, रा. जवाहर कॉलनी) आणि अनिल मनोहर (वय २९) हे गंभीर जखमी झाले. सोबतच्या वाहनांतील कार्यकर्त्यांनी अपघात पाहून थांबत तातडीने पोलिसांशी संपर्क केला. त्यामुळे अवघ्या १० मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.
जखमींना सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान प्रशांत निकाळजे यांचा मृत्यू झाला. अन्य चार जखमींना नाशिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलिसांना कंटेनरची नंबर प्लेट मिळून आली. त्याआधारे समृद्धी महामार्गावरील सर्व टोल प्लाझांना त्याची माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजय महाजन, किरण पवार, नवनाथ आडके हे कंटेनरच्या शोधासाठी खासगी वाहनातून जालन्याच्या दिशेने रवाना झाले. कंटेनर सिंदखेड राजा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. समृद्धी महामार्गाच्या कडेला चालक स्वयंपाक करताना सापडला.
अंत्यविधीला गर्दी…
सचिन आणि त्यांचा मेहुणा अपघातात मृत्यूमुखी पडल्याचे घरी कळवताच सचिनची पत्नी शीतलवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकाचवेळी पती आणि भाऊ गमावल्याने तिने हंबरडा फोडला. शीतल आणि प्रशांतची पत्नी वंदना यांचा आक्रोश पाहून सर्वांनाच गहिवरून आले. अंत्यविधीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन यांना तन्वी (गुट्टू) ही ५ वर्षांची मुलगी असून, प्रशांत यांना सदिच्छा ही ५ वर्षांची मुलगी आहे. बसपाच्या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरहून १७ पदाधिकारी मुंबईला गेले होते.