छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासकीय पत्र व्यवहार, टिपणी लेखन निर्दोष आणि सहज समजेल अशा भाषेत असायला हवे. यासाठी भाषा, व्याकरण, शुद्धलेखन यावर विशेष लक्ष देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, ४ डिसेंबरला प्रशिक्षण कार्यक्रमात दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय कामकाजातील पत्रव्यवहार, टिपणी लेखन, नस्ती, अहवाल लेखन याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक महसूल प्रबोधिनीतील प्रशिक्षक अरुण जोशी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की शासनाचा पत्र व्यवहार, विविध प्रस्ताव तयार करण्याचे काम हा लिपिकवर्गीय कर्मचारी करत असतो.
या कामकाजात मराठी भाषेचा वापर करताना व्याकरण, शुद्धलेखन व सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या शब्दांचा वापर करावा. भाषेविषयीचे नियम, शासकीय नस्ती आदींचे अवलोकन करून आपले ज्ञान अद्ययावत करावे. विविध शब्दांचे अर्थ व त्याप्रमाणे शब्दांचा योग्य उपयोग करून प्रशासकीय काम लोकाभिमुख आणि सोपे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय पत्र व्यवहार, टिप्पणी लेखन यामध्ये असणाऱ्या विविध विषयाच्या मुद्देनिहाय माहिती अंतर्भूत करणे. चूका होऊ नये त्यासाठी आवश्यक ती घ्यावयाची काळजी घेणे. परिपूर्ण पत्रव्यवहारासाठी संबंधित शासन निर्णयांचे संदर्भ देणे इ. बाबी आवश्यक असल्याचे प्रशिक्षक अरुण जोशी यांनी सांगितले. प्रशिक्षणात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले.