छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दारू पिण्यास विरोध केला म्हणून सख्ख्या भावाच्या डोक्यात दारूची बाटली फोडून जखमी केल्याची घटना औरंगपुऱ्यातील गोकुळवाडीत मंगळवारी (३ डिसेंबर) दुपारी साडेबाराला घडली.
बंडू शिवाजीराव मगर (वय ५०, गोकुळवाडी, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते औरंगपुरा भाजीमंडीत कडधान्याची दुकान चालवतात. ते चार भाऊ असून सर्व एकत्र राहतात. त्यापैकी लहान भाऊ अंकुश शिवाजीराव मगर (वय ३३) दारू पिण्याच्या सवयीचा आहे. रोज घरी बायकोसोबत व त्याच्या मुलासोबत भांडण करून मारहाण करतो. मंगळवारी (३ डिसेंबर) दुपारी साडेबाराला अंकुश दारू पिलेला असताना बंडू त्याला समजावून सांगत होते.
“तू दारू पिवून बायको व मुलांना त्रास देऊ नको. तू दारू पिणे सोड’, असे समजावून सांगत असताना त्याचा राग अंकुशला आला. त्याने त्याच्या हातातील दारूची बाटली बंडू यांच्या डोक्यावर मारून डोके फोडले. “तू मला सांगणारा कोण’, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यामुळे बंडू हे पत्नीसोबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी उपचारकामी मेडिकल मेमो देऊन त्यांना घाटी रुग्णालयात पाठवले. घाटीत औषधोपचार घेऊन बंडू यांनी अंकुशविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अंकुशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुषमा चांदेकर करत आहेत.