छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील बीड बायपासवरील ग्लोरियस वॉईन शॉपवर सोमवारी (२ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास गुंड अक्षय ऊर्फ भैय्या रमेश वाहूळ (वय २३, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) याने मोठाच राडा केला. चाकूचा धाक दाखवून दारूचा फुकट बॉक्स मागितला. कामगाराने नकार दिल्यावर चाकूने वार केले. ही माहिती पोलिसांना कळताच ते धावून आले. त्यांच्यावरही अक्षयने हल्ला चढवला व सोबतच्या महिलेसोबत मोपेडवर पसार झाला.
महेंद्र कमलनारायण जैस्वाल (वय ५६, रा. जिजामाता कॉलनी, पैठणगेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ग्लोरियस वॉईन शॉप असून, त्याच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या दुकानात अक्षय ऊर्फ भैय्या रमेश वाहूळ (वय २३, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) हा आला. त्याने दारूचा बॉक्स मागितला. त्यावर जैस्वाल यांच्याकडील कर्मचाऱ्याने त्याला म्हटले, की तू दोन दिवसांपासून आमच्या दुकानातून शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून फुकट दारूचे बॉक्स नेले आहेत. तुला आम्ही रोज रोज दारूचे बॉक्स देणार नाही. त्यावर संतापलेल्या अक्षयने त्याच्या कमरेला असलेला धारदार चाकू काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने कर्मचारी आजिनाथला मारला.
तितक्यात दुकानातील दुसरा कर्मचारी आकाश फुले याने त्याचा हात पकडला व पोलिसांत फोन केला. पोलीस अंमलदार दीपक शिंदे व मनोज अकोले लगेचच आले. त्यांच्यासोबतही अक्षयने झटापट करून हातातील चाकू वार करण्याच्या उद्देशाने हवेत फिरवला. मला हात लावाल तर मी जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. झटापटीत दीपक शिंदे यांच्या हाताला चाकू लागला. त्यानंतर अक्षय वाहूळ तिथून त्याच्यासोबत आलेल्या मोपेडवरील महिलेच्या मागे बसून दोघेही पळून गेले. त्यानंतर अक्षयने आजीनाथच्या मोबाइलवर कॉल करून धमकावले, की तू आज खूप चुकीचं केलं. आता मी तुमचे वाईन शॉप जाळून टाकतो. तू गेला आणि तुझा मालकही गेला आता… असे म्हणून त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जैस्वाल यांनी सातारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश देशमुख करत आहेत.