छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.
प्रभाकर पारधे, डॉ. कुणाल खरात, काकासाहेब काकडे, सुभाष वाघुले, मोनिका मोरे, अंकिता राजहंस, अमोल गायकवाड, विकास एडके यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की इम्तियाज जलील यांनी कधीही जातिवाद केलेला नाही. ते सर्व समाजांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्याविरुद्ध तक्रार देणारे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी भारतनगर मतदान केंद्रावर बोगस मतदानाचे प्रयत्न केले होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न जलील यांनी केला. आपल्याविरुद्ध गैरप्रकाराबद्दल गुन्हा दाखल होईल म्हणून ३० तासांनंतर जलील यांच्याविरोधातच ॲट्रॉसिटीची तक्रार देण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा तेथे पोलीस अधिकारीही हजर होते, असे निवेदनात म्हटले आहे.