फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : पानवाडी (ता. फुलंब्री) येथील सानिया अनिस शेख (वय २०) या विवाहितेला पतीसह सासरच्यांनी विष पाजले. उपचारानंतर बरी झालेल्या विवाहितेने फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध सोमवारी (२ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
सानियाने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास पती अनिस मन्नू शेख याने माहेरहून जेसीबी घेण्यासाठी २ लाख रुपये आण, अशी मागणी केली. सानियाने माझे वडील गरीब असून ते पैसे देणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे अनिसने सानियाला मारहाण केली. यानंतर पती अनिससह अमिना फय्याज शेख, अंजूम युनूस शेख, युनूस मन्नू शेख, शकिला अंजू शेख, फय्याज मन्नू शेख, मन्नू शेख, खैरू मन्नू शेख यांनी सानियाचे हातपाय धरून बळजबरीने तिला विष पाजले. नातेवाइकांनी तिला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात हलविले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सानियाने फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली.