छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराचा पाणीपुरवठा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत झालेला असतो. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही शहरात मात्र कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी यंत्रणेत बिघाड होतो, तर कधी एखाद्या कामासाठी पाणीपुरवठा बंद केला जातो. शहरवासियांना महिन्यात १० दिवसही नीट पाणीपुरवठा होत नाही, जो होतो तोही अपुरा असतो. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी (३ डिसेंबर) महापालिका आयुक्तांना भेटून संताप व्यक्त केला. त्यावर नेहमीप्रमाणे आयुक्तांनी आश्वासनावर त्यांची बोळवण केली.
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पश्चिम विभागप्रमुख राजू शिंदे यांनी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतली. यावेळी जी. श्रीकांत यांनी अतिरिक्त मनुष्यबळ, टोल फ्री नंबर देण्याचे आश्वासन देत पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येऊन फेब्रुवारीपासून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी माजी नगरसेवक सीताराम सुरे, संतोष खंडके, गिरजाराम हळनोर, सुकन्या कुलकर्णी, विजय वाघमारे, हरिभाऊ हिवाळे, सुनीता आऊलवार, नारायण जाधव, बापू जहागीरदार, नितीन झिरे, अमोल थोरे, निशा लोखंडे, आशा दातार, मीरा देशपांडे, किशोर नागरे, शिला गुंजाळे, प्रतीभा राजपूत, विनोद सोनवणे, दिनेश राजेभोसले, देविदास पवार आदी उपस्थित होते.