छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गुंड प्रवृत्तीची, खुनशी स्वभावाची सुहाना ऊर्फ गुड्डी शेख (वय २८) पुन्हा शहरात सक्रीय झाली असून, ती गुंड प्रवृत्तीच्या बनावट तृतीयपंथीयांच्या टोळ्या बनवून लोकांना लुटत आहे. तिला गेल्या वर्षी जुलैमध्ये शहरातून हद्दपार करण्यात आले होते. आता ती नारळीबागेत राहत असून, गोरगरीब तृतीयपंथीयांवर समाजविघातक कृत्यात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत आहे, असा आरोप छत्रपती संभाजीनगरसह अहिल्यानगर, नाशिक, धुळे येथील तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींनी केला आहे. तिच्याविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तालयासमोर मंगळवारी (३ डिसेंबर) धरणे आंदोलन केले.
शहर पोलिसांनी जुलै २०२३ मध्ये तिला शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. गुंडगिरी करणाऱ्या सुहानाविरुद्ध सातारा, उस्मानपुरा, छावणी, बेगमपुरा, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तिचे शहरात अनेक गट आहेत. ते सार्वजनिक रस्त्यावर चौकात एकत्र येऊन वाहनचालकांकडून आणि पायी चालणाऱ्यांना पैशांसाठी जबरदस्ती करतात. सुहानाने शहरात दहशत निर्माण केली होती. पैसे न दिल्यास ती जीवे मारण्याचा धाक दाखवून पैसे मागत होती. प्रसंगी मारहाण करत होती. ती राहत असलेल्या परिसरातील लोकांमध्येही तिची दहशत होती. नागरिक तिच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यानंतर तिला हद्दपार करण्यात आले होते.
पुन्हा शहरात दाखल…
आता सुहाना पुन्हा शहरात आली आहे. शहरातील नारळीबाग भागात राहत असून, तृतीयपंथीसदृश लोकांना सोबत घेऊन टोळी चालवत आहे. सुहानाकडून शहरातील तृतीयपंथीयांच्या समुदायाला धोका आहे. ती रात्री बेरात्री येऊन समाजविघातक कृत्यात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत आहे, असा आरोप तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींनी निवेदनात केला आहे. निवेदनावर अहमदनगर येथील काजल गुरू, नाशिकची सलमा गुरू नायक, धुळे येथील पद्मा गुरू नायक यांच्या सह्या आहेत. मागण्यांचे निवेदन विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना स्वीकारले.