छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जुन्या वादातून हर्सूल जेलसमोरील मैदानावर चाकूने भोसकून हत्या केलेल्या दिनेश ऊर्फ बबलू मोरे (वय ३२, रा. चेतनानगर, हर्सूल) याचा मृतदेह नातेवाइक व त्याच्या मित्रांनी थेट पोलीस आयुक्तालयात आणला. अचानक शेकडोंचा जमाव पोलीस आयुक्तालयात दाखल झाला. त्यांनी खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींच्या साथीदारांनाही अटक करण्याची मागणी केली. गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह नेण्यात आला. हा प्रकार मंगळवारी (३ डिसेंबर) दुपारी घडला.
मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घाटीतून थेट पोलीस आयुक्तालयात आणून प्रवेशद्वारासमोरच ॲम्ब्युलन्स लावून दिनेशच्या नातेवाइक व मित्रांनी ठाण मांडले होते. खून केल्यानंतर आरोपी एका कारमधून शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाला हे कळताच सहाय पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी सहकाऱ्यांसह मिळून चिकलठाणा परिसरात गणेश ऊर्फ कुणाल सोनवणे व अनिकेत ऊर्फ विक्की गायकवाड यांना अटक करून बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना न्यायालयात हजर केले असता ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी मंगळवारी दिले. चाकू हस्तगत करायचा आहे, आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे, खुनाच्या कारणाचा तपास बाकी असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी केली होती.
अशी केली होती हत्या…
बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांत गणेश सोनवणे, अनिकेत गायकवाड आणि त्यांच्या तीन साथीदारांचा समावेश आहे. मिलिंद यांचा मित्र असलेला दिनेश आई-वडिलांसोबत राहत होता. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता. प्लॉटिंगचा व्यवसायही करायचा. सोमवारी सकाळी ११ पासून मिलिंद आणि दिनेश दिवसभर सोबत होते. दिनेश याला दिवसभर गणेश सोनवणे व अनिकेत गायकवाड यांचे तू कुठे आहे, तुला भेटायचे आहे, असे फोन येत होते. तसेच गल्लीतील नितीन व रत्नाबाई हे फोन करून दिनेशला सांगत होते की, तू गल्लीत येऊ नको तुला मारण्यासाठी शोधत आहेत. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास दिनेशला कुणाचा तरी फोन आला व त्याने सांगितले की, हर्सूल जेलसमोरील ग्राऊंडवर ये, आपण कॉम्प्रमाईज करून घेऊ. त्यावरून दिनेशसोबत मिलिंद व सुमित प्रकाश चव्हाण व प्रमोद लालचंद थुने असे सर्व जण हर्सूल जेलच्या समोरील रोडवर गेले.
तिथे मोटारसायकली उभ्या करून दिनेश, सुमित प्रकाश चव्हाण (वय ३५, रा. मिसारवाडी) आणि प्रमोद थुने असे खाली ग्राऊंडवर उतरले. त्यावेळी तेथे असलेले गणेश सोनवणे, अनिकेत गायकवाड व त्यांच्यासोबत दोन ते तीन अनोळखी व्यक्ती हातात लाकडी दांडे, क्रिकेट बॅट व रॉड घेऊन उभे होते. त्यानंतर गणेश सोनवणे, अनिकेत गायकवाड या दोघांनी दिनेश याच्या गळ्यात हात घालून त्याला बाजूला घेऊन गेले व अचानक प्रथम दोघांनी त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी रॉडने व त्यानंतर दोघांनीही चाकू काढून त्यास चाकूने भोसकण्यास सुरुवात केली. दिनेशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर, डाव्या कानाच्या वर डोक्यावर, कंबरेवर, मांडीवर असे सपासप चाकूचे वार केले. अनोळखी दोन ते तीन व्यक्तींनी सुध्दा लाकडी दांड्याने दिनेशला मारहाण केली. त्यावेळी सुमित चव्हाण व प्रमोद थुने असे दोघांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिकेत गायकवाड याने सुमित चव्हाण याच्यावर चाकूने वार करून त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. सुमित चव्हाण पळाल्यामुळे त्याच्या पाठीवर चाकूचा वार लागून तो जखमी झाला.
दिनेश गंभीर जखमी होऊन कोसळल्यानंतर मारेकरी दोन मोटारसायकलीवर बसून पळून गेले. त्यानंतर दिनेश याला मिलिंद, सुमित व प्रमोद यांनी एक रिक्षा चालकाला थांबवून रिक्षात टाकून उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला सायंकाळी पाचला मृत घोषित केले. गणेश सोनवणेसोबत हर्सूलचा दादा कोण, यावरून दिनेशचा ६ महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर मोरे आणि सोनवणे यांच्या गटांत वाद पेटला होता. गणेश सोनवणे हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अनिकेत गायकवाडविरुद्धही गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्याची योग्य संधी संशयित शोधत असताना त्यांनी दोन दिवसांपासून दिनेशचा माग काढला. मात्र त्यांच्या टप्प्यात तो सापडत नव्हता. गुरुवारी त्यांनी त्याला संपविण्याचा चंगच बांधला आणि मांडवलीच्या नावाखाली बोलावून घात केला. दिनेशचा ६ महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. १५ डिसेंबरला त्याचे लग्न होते. दिनेशच्या हत्येची बातमी कळताच त्याचा मित्र परिवार घाटीत दाखल झाला होता. या घटनेचा तपास बेगमपुरा पोलीस करत असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. वृत्त लिहीपर्यंत ते हाती लागलेले नव्हते. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे यांनी भेट दिली.