छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून स्वतःच्या खोलीत नेत पाशवी लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय नराधमाला वैजापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (२ डिसेंबर) सुनावली.
तुकाराम परसराम जाधव (वय ४७, मूळ रा. उर्मी, नरनूल सावंगी, जि. आदिलाबाद, तेलंगणा) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी घडली होती. नराधम चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत असताना वेदनांमुळे ती ओरडत होती. आवाज तिच्या आईने ऐकून शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीची सुटका केली. रक्तबंबाळ अवस्थेतील मुलीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी केला. तपास कामात त्यांना पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे व सुरेश कचे यांनी मदत केली. नराधमाविरुध्द सबळ पुरावे मिळाल्यानंतर वैजापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. वैद्यकीय पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब आणि पीडित मुलीची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरली. त्यावरून नराधम तुकाराम जाधव याला न्यायालयाने शिक्षा सुनावली.