छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरट्यांनी सध्या हैदोस घातला आहे. घरे, दुकाने, एटीएम सेंटर फोडून गेल्या आठच दिवसांत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकट्यादुकट्या व्यक्तीला लुटून नेण्याच्या घटना, मंगळसूत्र चोरीच्या घटनांनीही कळस केला आहे. अशातच अशी बातमी समोर आली आहे, जी वाचून तुम्ही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्सा मशिदीजवळील वैशाली ढाब्याजवळ ही घटना घडली. चोरट्यांनी रविवारी (१ डिसेंबर) दुपारी घरासमोरील दोन बकऱ्या आणि बोकूड चोरून नेले.
शाहरुख अजमीर खान (वय ३०, रा. अक्सा मशिदीजवळ) यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते मिस्तरी काम करतात. त्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या आणि एक बोकूड दोन वर्षांपासून आहे. रविवारी सकाळी ११ ला त्यांनी बकऱ्या आणि बोकूड घरासमोर चारा टाकून बांधलेल्या होत्या. दुपारी पाऊणला ते परतले असता बोकूड आणि बकऱ्या जागेवर नव्हत्या. कोणीतरी चोरून नेल्या. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नासेर शेख करत आहेत.