छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय घेऊन तू आमच्या गोविंदला शोभत नाहीस, असे म्हणून शारीरिक, मानसिक छळ करण्याबरोबरच सतत उपाशीपोटी ठेवले जायचे… माहेरावरून १० लाख रुपये आणण्याची मागणी केली जायची… अशी तक्रार २२ वर्षीय विवाहितेने विरगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोमल गोविंद कुऱ्हाडे (वय २२, रा. सावखेडगंगा, ता. वैजापूर) असे तक्रारदार विवाहितेचे नाव असून, पती गोविंद, सासरे सूर्यभान, सासू सुनिता, दीर कृष्णा व गोपाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तिचे पती आसाम रायफल्समध्ये नोकरीला आहेत. तिचे लग्न २७ नोव्हेबर २०२२ रोजी झाले. तिला सुरुवातीचे दोन-तीन महिनेच चांगले वागवले. नंतर चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत मारण्याच्या धमक्या देऊ लागले. तू आमच्या गोविंदला शोभत नाहीस म्हणायचे. सतत उपाशीपोटी ठेवून छळ करायचे. पती सुटी घेऊन घरी आले की त्यांना विवाहिता त्रासाबद्दल सांगायची. तेव्हा पतीही त्यांचीच बाजू घ्यायचा, असे विवाहितेने म्हटले आहे. माहेरावरून १० लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी त्यांनी तिला घरातून हाकलून दिले. तेव्हापासून ती माहेरी राहते, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार परमेश्वर चंडेल करत आहेत.