छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा येथील खंडोबा यात्रा सुरू झाली असून, सोमवारी (२ डिसेंबर) घटस्थापना होऊन धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. आज, ३ डिसेंबरला पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती. चंपाषष्टीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत दर्शनासाठीची गर्दी कायम राहणार आहे.
यात्रेत चंपाषष्ठीला (७ डिसेंबर) वाघे मंडळाचा जागर गोंधळ आणि सायंकाळी कलगी-तुरा स्पर्धा होणार आहे. सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती होईल. चंपाषष्ठीला मंदिर परिसरात महाराष्ट्रातून आलेल्या वाघ्या मंडळांचा जागर गोंधळ कार्यक्रम होईल. चंपाषष्ठीला सायंकाळी ७ पासून कलगी-तुरा रंगेल. जिल्ह्यातून गोलवाडी, जटवाडा, जोगवाडा, चिमणपीरवाडी, पडेगाव, जांभळी, गांधेली आदी ठिकाणांहून १५ पथके दाखल होतील. स्पर्धेचे संयोजन बहादूर खाँ अकबर खाँ पटेल दरवर्षी करतात. महाआरतीवेळी वेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती असेल. खासदार संदिपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती असेल, असे ट्रस्टचे अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर यांनी कळविले आहे.
पार्किंगसाठी लूट कायम…
कर्णपुरा यात्रेत पार्किंग कंत्राटदाराने वाहनचालकांची केलेली लूट चर्चेत आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय संस्थानकडून किंवा प्रशासनाकडून करणे गरजेचे असते. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थान समितीकडून यात्रा काळातील पार्किंगचे कंत्राट ९५ हजार रुपयांत दिले आहे. एमआयटी कॉलेज, एसआरपी कॅम्प, कांचनवाडी, होळकर चौक या ठिकाणी पार्किंगची सोय असेल. यात दुचाकीसाठी २० रुपये, ऑटोरिक्षासाठी ३० रुपये आणि चारचाकीसाठी ५० रुपये दर आकारला जाणार आहे.