छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या कन्नड मतदारसंघात पत्नी संजना जाधव यांचा झालेला विजय पती हर्षवर्धन जाधव यांना रुचलेला, पटलेला नाही. त्यांनीही ईव्हीएमवर संशय घेत व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे आणि अन्य एका उमेदवाराने अशीच मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.
निकाल लागून आठवडा होत आला तरी पराभूत उमेदवारांना जनकौल मान्य झालेला दिसत नाही. त्यांनी ईव्हीएम मतमोजणीवर आक्षेप घेतला असून, वेगवेगळे आरोप करून संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांचे समर्थक झालेले मतदान, मोजलेले मतदान यातील फरक व्हायरल करत आहे. तीन उमेदवारांनी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजा, ईव्हीएमचा डेमो दाखवू नका, अशी मागणी केली आहे. पश्चिम मतदारसंघातील राजू शिंदे हे शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्याकडून पराभूत झाले आहेत, तर कन्नडमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांच्याकडून पराभूत झाले आहेत.
संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव व मावळते आमदार तथा ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंह राजपूत या दोन दिग्गजांना धूळ चारली. संजना जाधव यांना एकूण ८४,४९२ मते मिळाली, तर हर्षवर्धन जाधव यांना ६६,२९१ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर उदयसिंग राजपूत यांना ४६,५१० मते मिळाली. पती-पत्नी एकमेकांविरोधात उभे असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते. त्यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार २०१ मतांनी पराभव केला. राजू शिंदे यांनी काही भागातील ठराविक मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली आहे.
काय असते प्रक्रिया…
पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज आला की जिल्हा प्रशासनाकडून ते निवडणूक आयोगाकडे पाठवतात. राज्यातील सर्व अर्जांवर आयोगाला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड अर्थात भेल या कंपनीकडे अर्ज जमा केले जातात. एखाद्या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झाली असेल तर न्यायालयात अर्ज करून आयोगाला ईव्हीएम तपासणीची परवानगी मागावी लागते. जिथे न्यायालयात प्रकरण नाही,
तिथे निवडणूक आयोग निर्णय घेऊन वेळापत्रक ठरवते आणि केंद्रनिहाय ईव्हीएम बाहेर काढून त्या पुन्हा तपासणीसाठी आणतात. ही प्रक्रिया मोफत होत नाही. यासाठी पुन्हा मोजणीची मागणी करणाऱ्यांना ४७ हजार २०० रुपये १८ टक्के जीएसटीसह कोषागार विभागात चालानसह भरावे लागतात. यासाठीही निकषक आहेत, निकाल जाहीर झाल्यानंतर क्रमांक दोन व तीनवर असलेल्या उमेदवारांनाच मतमोजणी आक्षेपाबाबत ७ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे अर्ज द्यावा लागतो. ५ टक्के ईव्हीएमचीच तपासणी होते. एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवारांनी मागणी केली तर अडीच-अडीच टक्के ईव्हीएमची तपासणी त्यांच्यासाठी होते.