छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना रोडवरील अपना बाजार इमारतीतील शीतल एजन्सी फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ३१ हजारांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी समोर आली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आनंद सुमेरनंद बन्सल (वय ४७, रा. सिडको एन-१) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे अपना बाजार इमारतीत शीतल एजन्सी नावाने बेअरिंगचे दुकान आहे. २७ नोव्हेंबरला सायंकाळी सव्वासातला दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्रीतून चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून गल्ल्यातील २ लाख ३१ हजारांची रोख रक्कम लंपास केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बन्सल हे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी पथकासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले होते. पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात चोर दिसत आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.