सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : एकतर्फी प्रेमातून तरुणाने १६ वर्षीय मुलीला इतके छळले की तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पळसखेडा (ता. सोयगाव) येथे समोर आली आहे. तो मुलीवर संबंध ठेवण्यासाठी, भेटण्यासाठी हट्ट करत होता. त्यासाठी वारंवार चिठ्ठ्या लिहित होता. मुलीच्या पित्याने फर्दापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माथेफिरू तरुणाविरद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुनील राजू सोनत (वय १९, रा. पळसखेडा, ता. सोयगाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या घरासमोर राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. यातून तिला त्रास द्यायचा. तिला भेटून माझ्याशी संबंध ठेव, असे म्हणत होता. यासाठी वारंवार तिला चिठ्ठ्या देत होता. मनाविरुद्ध हा सर्व प्रकार होत असल्याने मुलगी दहशतीखाली येऊन नैराश्यात गेली. परिसरात बदनामीही होत नसल्याने ती अधिकच धास्तावली. तिने पालकांना सांगितल्यानंतर तिच्या पालकांनीही त्याची समजूत काढली होती. मात्र तरीही त्याचे त्रास देणे थांबले नाही. अखेर मुलीने बुधवारी (२७ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सुनील हा मुलीला नवरात्रोत्सवापासून त्रास देत असल्याचे समोर आले आहे. मुलगी शाळेत असताना तिच्यासमोर मोबाइल फेकून माझ्यासोबत बोल, असा आग्रह करत होता.