छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यात गोवंश हत्याबंदी आहे. गायींची कत्तल होऊ नये म्हणून जिल्ह्यात गोरक्षक सतर्क असतात. मात्र त्यांच्यावर आता हल्ले होऊ लागले आहेत. जालना रोडवर वायटू कंपनीसमोर गोरक्षक वैभव कपूरचंद पांडे (वय ३२, रा. रामपूर, छत्रपती संभाजीनगर) यांना घेरण्यात आले. बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रामनगर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याआधी पळशी, दौलताबाद आणि फुलंब्रीतील गोरक्षकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून, हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे.
पांडे यांच्यावर सध्या समक्ष सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. सिडको एमआयडीसी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. जबाबात त्यांनी सांगितले, की बुधवारी (२७ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते आणि त्यांचा भाचा आदित्य विनोद पांडे मोटारसायकलीने चिकलठाणा ते केम्ब्रीज असे जात होते. जालना रोडवर वायटू कंपनीसमोर गर्दी दिसल्याने ते थांबले असता एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. तू यापूर्वी माझ्या गायी पकडून दिल्या होत्या. त्यामुळे माझे चार लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे, असे म्हणून त्याने हातातील फायटर वैभव पांडे यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे पांडे जखमी झाले. त्या व्यक्तीसोबतच्या दुसऱ्या मुलाने वैभव यांची कॉलर पकडली व हाताचापटाने मारहाण सुरू केली.
भाचा आदित्य त्यांना सोडवण्यासाठी आला असता त्यालादेखील त्यांनी हाताचापटाने मारहाण सुरू केली. बरीच गर्दी झालेली होती. तितक्यात तिथे पांडे यांच्या ओळखीचे सुनिलअण्णा नवपुते मोटारसायकलीने आले. त्यांनी त्या दोघांना समजावून सांगितले असता त्यांनाही दोघांनी शिवीगाळ केली. दोघांच्या ओळखीचे बरेच लोक जमा झालेले होते. थोड्या वेळाने पांडे यांच्या ओळखीचे सत्यम दुर्गादास धोत्रे हेदेखील आले. त्यांनी फायटरने मारहाण करणारा कदीर मोहम्मद (रा. चिकलठाणा) व त्याच्यासोबत रेफ (रा. चिकलठाणा) असल्याचे सांगितले. दोघांनी जाताना पांडे यांना धमकी दिली, की तू परत भेट. मग तुला दाखवितो. त्यानंतर सुनिल नवपुते व सत्यम धोत्रे यांनी पांडे यांना मोटारसायकलीवर बसवून सह्याद्री हॉस्पीटल, रामनगर येथे उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी कदीर मोहम्मद व आरेफ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे करत आहेत.