फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत अनुसूचित जातीच्या व्यक्तीचे पार्थिव जाळण्यासाठी सरण रचले जात असताना गावातील विकृताने राडा केला. तुमची माणसे तुमच्या घरात जाळा असे म्हणत त्याने सरणावरील लाकडे लाथेने उधळली. पुन्हा इकडे आलात तर एकेकाला पाहून घेईल, अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळही केल्याची तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यात सोमवारी (२५ नोव्हेंबर) दाखल झाली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नक्की काय घडले?
सुभाष कडूबा वाहुळ (वय ४५, रा. धामणगाव ता. फुलंब्री) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की ते शेती करतात. रविवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी त्यांचे काका सूर्यभान पिराजी वाहुळ यांचे निधन झाले. अंत्यविधीसाठी गावातील समाज बांधव एकत्र आले. समाजाच्या स्मशानभूमीकडे पार्थिव नेण्याचे ठरले. सकाळी १० ला स्मशानभूमीत सरण रचत असताना गावातील भाऊसाहेब आनंदा डिडोरे हा तिथे आला. येथे सरण रचू नका. ही आमची जागा आहे, असे म्हणाला.
त्यावर वाहूळ आणि नातेवाइकांनी ही आमच्या समाजाची स्मशानभूमी आहे, असे समजावून सांगितले. त्यावर त्याने रचलेल्या सरणाची लाकडे इकडे तिकडे फेकून देत, जातीवरून शिवीगाळ करत तुमचे माणसे तुम्ही तुमच्या घरात जाळा. येथे जाळायचे नाही. ही आमची जागा आहे, असे म्हणून सरणाची लाकडे पायाने उधळली. परत जर तुम्ही येथे आला तर तुम्हाला एक एकाला पाहून घेईन, अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे वाहूळ यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी भाऊसाहेब आनंदा डिडोरे (रा. धामणगाव, ता. फुलंब्री) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.