मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्याने अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्रीपद भाजपकडे येणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत होते. मात्र ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र आधीच ठरलेले असल्याने अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला आणि शिवसेनेला मान्य आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे म्हणाले, की स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. स्वत:ला कॉमन मॅन समजूनच आजवर काम केले. महायुती सरकारने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले याबद्दल आनंदी असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचेही आभार मानले. राज्यात जनहिताची कामे करण्यासाठी केंद्रातून मोठा पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. साधा कार्यकर्ता म्हणून मी करतो. मी नाराज नाही. नाराज होऊन रडणाऱ्यांतला नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मी नरेंद्र मोदींना माझ्या भावना कळवल्या आहेत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. माझ्यामुळे अडचण होईल हे मनात आणू नका, असेही त्यांनी आवर्जुन मोदी यांना सांगितल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदारांच्या भेटीगाठीही टाळून मुंबईत न थांबता आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले. मतदारसंघात जा, विजयाचा जल्लोष साजरा करा, विजयी रॅली काढा, असे शिंदे यांनी सांगितलं आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटाचे अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. त्यावर अद्याप निर्णय नाही. किती आमदारांना संधी मिळणार हे कळू शकलेले नाही. छत्रपती संभाजीनगरातून अब्दुल सत्तार,संजय शिरसाट हे शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने शिंदे गटाला मंत्रिमंडळात त्यांच्यापेक्षा कमी मंत्रिपदे मिळू शकतात. भाजपची मंत्रिपदे वाढणार असल्याने प्रशांत बंब यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपकडून अतुल सावे यांना मंत्रिपद पक्के मानले जात आहे.