छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यात मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतच मुख्यमंत्री कोण होणार, यावरून नेत्यांनी ज्याच्या जागा जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार ही विधाने केली होती. यापूर्वीही शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद भाजपने दिले होते, त्यावेळीही भाजपच्या १०५ जागा होत्या. मात्र सत्ता आणण्यासाठी भाजपने ती तडजोड केली. आता भाजपच्या १३२ जागा आल्या आहेत. ही निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने लढली. गेल्यावेळी जागा जास्त असूनही एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे भाजपने मुख्यमंत्रीपद दिले. पण आता त्याग करण्यात काहीच अर्थ नसल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांत व्यक्त होत असून, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणीसाठी आता कार्यकर्ते आग्रही झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या महिला पदाधिकारी सौ. मनीषा गणेश मुंडे-वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावे या मागणीचे पत्र रक्ताने लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.
काय म्हटलंय पत्रात…
प्रति,
माननीय भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी,
माननीय फायर ब्रँड भारत देशाचे गृहमंत्री अमित भाई शहाजी
महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडक्या बहिणीचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात विधानसभेत घवघवीत यश प्राप्त केले. मागील पाच वर्षांत आमच्या देवाभाऊंना विरोधकांकडून जातिवाचक शेरेबाजी, पत्नीवरून अभद्र शेरबाजी, आईवरून शिवीगाळ, अटकेचे षडयंत्र, शारीरिक टिपण्या, मराठा आरक्षण आंदोलनात खलनायकाचा शिक्का… इतकं सगळं सहन करूनही न डगमगता न थांबता अहोरात्र फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा देवा भाऊ यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, ही आदरणीय देशाचे पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री यांना महाराष्ट्रातच महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीची मनःपूर्वक विनंती…
धन्यवाद!!
सौ. मनीषा गणेश मुंडे-वाघ
आपलीच भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ कार्यकर्ती
छत्रपती संभाजीनगर
मंगळवारीही शहर भाजपने सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे साकडे घातले होते. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आरतीत सहभागी झाले होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास याच मंदिरात आम्ही मोठी पूजा करू, असेही बोराळकर म्हणाले होते.
असं आहे राज्यातील पक्षीय बलाबल…
भाजप : १३२
शिंदे गट : ५७
अजित पवार गट : ४१
ठाकरे गट : २०
काँग्रेस : १६
शरद पवार गट : १०