छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज सिडको महानगर-१ मधील राज स्वप्नपूर्ती सोसायटीत गुरुवारी (२० नोव्हेंबर) पहाटे तिघांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. ही बाब सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख ६० हजार रुपये असा एकूण तिघांच्या घरातून ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शासकीय कर्मचारी योगेश्वर रखमाजी जाधव बुधवारी निवडणूक कामासाठी जालना जिल्ह्यात गेले होते, तर त्यांची पत्नी रामेश्वरी या तुर्काबादला सासरी मतदानासाठी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पहाटे जाधव यांना सोसायटीतून शेजाऱ्यांनी कॉल करून तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. जाधव यांनी तातडीने घरी येऊन पाहिले असता अंदाजे दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने कपाटातून चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले.
याच सोसायटीत राहणारे अनिल चांगदेव माळवदे हे घाटी रुग्णालयात काम करतात. बुधवारी मतदानाला कुटुंबीयांसह लोणी (ता. राहाता) येथे गेले होते. त्यांनासुद्धा शेजाऱ्यांनी कॉल करून तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ते घरी आले असता घरातून अंदाजे दोन तोळे सोन्याचे तर अडीच तोळे चांदीचे दागिने, रोख ५० ते ६० हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बदनापूर येथे बहिणीच्या घरी कार्यक्रमासाठी सहकुटुंब गेलेल्या सागर देवसिंग जोनवाल यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…
सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. गुरुवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे १.५८ वाजता ५ चोरटे सोसायटीत आले. २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यांनी तीन घरे फोडली. २० ते ३० वर्षे वयाचे चोरटे दिसून येतात. त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. एकाच्या पाठीवर कॉलेज बॅग होती. घर फोडण्यासाठी तिघे गेल्यावर बाहेर लक्ष ठेवण्यासाठी दोघे थांबलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सोसायटीत धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान सोसायटीतच घुटमळले.