पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली आहे. आता वडजी शिवारात गुरुवारी (२० नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास कापूस वेचत असलेल्या महिलेवर हल्ला करून बिबट्याने जखमी केले. रेणुका विठ्ठल वीर (वय ३३, रा. वडजी) असे जखमी महिलेचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून पैठण तालुक्याच्या विविध भागांत बिबट्या दिसून येत आहे. यामुळे शेतकरी, नागरिक धास्तावले आहेत. वडजी शिवारात बिबट्याने यापूर्वी दोन वगारी, एका हरणावर हल्ला करून फडशा पाडलेला आहे. त्यानंतर थेट महिलेवर हल्ला केला. विठ्ठल वीर यांच्या शेतात रेणुका या मुलगी मोनिका (वय १४) हिच्यासह कापूस वेचत होत्या. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रेणुका यांच्यावर हल्ला केला. मोनिकाने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे शेतकरी धावून आले.
दगडे भिरकावून व मोठ्याने आवाज करून त्यांनी बिबट्याला हुसकावले. रक्तबंबाळ अवस्थेतील रेणुका यांना नातेवाइकांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे शेतकरी भयग्रस्त झाले असून, वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
वैजापूर तालुक्यातील चांदेगाव येथील शेतकरी भगवान रायभान काळे यांच्यावरही बिबट्याने हल्ला चढवून जखमी केले. ते २१ नोव्हेंबरला शेतात कांद्याला पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार चालू करायला सायंकाळी सहाला विहिरीत जात असताना अचानक रस्त्यावरच मागून आलेल्या बिबट्याने हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने वस्तीवर असलेल्या सोमनाथ आळे व त्यांचा मुलगा अनिकेत यांनी मदतीला धावून येत बिबट्याला पिटाळले. हल्ल्यात काळे जखमी झाले आहेत.