छत्रपती संभाजीनगर (एससीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणचा सहायक महसूल अधिकारी दत्ता रमेशराव राऊत (वय ३७) याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली. कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
आजोबांच्या नावे असलेल्या उदगीर तालुक्यातील लिंबगाव येथील जमिनीचा कुळ कायद्यानुसार दाखल दाव्याचा निकाल २०१४ मध्ये लागला होता. त्या निकालाची प्रत तक्रारदाराने राऊतकडे मागितली होती. राऊतने तीन हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून ३ हजार रुपये घेताना राऊतला त्याच्याच कार्यालयाच्या परिसरात रंगेहात पकडले.