छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवाजीनगर भागातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील मतदान केंद्रावर छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी १० ते १२ कार्यकर्त्यांसह राडा केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत दमदाटी करून गोंधळ घालत मतदारांसह भाजप समर्थकांना हाताचापटाने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
गुरुवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी हा हाणामाणारीचा प्रकार घडला होता. पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी तक्रार दिली, की ते आपल्या सहकाऱ्यांसह पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील मतदान केंद्रावर बंदोबस्ताला असताना मतदान केंद्राच्या दोन नंबरच्या खोलीसमोर जलील यांनी १० ते १२ कार्यकर्त्यांसमोर येऊन तिथे उपस्थित ६ ते ७ जणांना बोगस मतदान होत आहे, असा आरोप करून दमदाटी करायला सुरुवात केली. त्यानंतर गोंधळ घालून हाताचापटाने मतदार आणि भाजप समर्थकांना मारहाण केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. भालेराव करीत आहेत.