छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणाला हस्तक्षेप करून एका मुलीला बोलणे चांगलेच महागात पडले. तिच्या दोन भावांनी येऊन त्याला बेदम मारहाण केली. इतकी की तो रक्तबंबाळ झाला. ही घटना बुधवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाळूज येथील भगतसिंगनगरात घडली.
अमित रघुनाथ गायकवाड (वय २२, रा. भगतसिंगनगर वाळूज ता. गंगापूर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पत्नीसह राहतो. मजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालवितो. बुधवारी सायंकाळी साडेसातला तंबाखूची पुडी आणण्यासाठी भाभीच्या दुकानात गेला. तिथे अगोदरच एक मुलगी उभी होती. ती भाभीला म्हणत होती की माझा मोबाईल तुमच्या दुकानात राहिला आहे. तो द्या… त्यावर अमित त्या मुलीला म्हणाला की, भाभीकडे मोबाईल राहिला असेल तर त्या देऊन टाकतील. त्या ठेवणार नाहीत.
यावरून त्या मुलीचे भाऊ करण कांबळे, संतोष कांबळे तेथे आले. ते अमितला म्हणाले, की तू मध्ये का बोलतो, असे म्हणून त्यांनी अमितला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या ओठाला मार लागून रक्त निघाले. डाव्या कानास खालील बाजूस मार लागून रक्त निघाले. त्यानंतर दोघे तिथून पळून गेले. तो घरी आला. त्याच्या आईने त्याला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांन मेडिकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. उपचार घेतल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी करण कांबळे व संतोष कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार किरण जाधव करत आहेत.