छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : निकाल येण्याआधीच आमदारकी अंगात शिरलेल्या काहींनी कार्यकर्त्यांच्या बळावर बुधवारी (२१ नोव्हेंबर) अक्षरशः धुमाकूळ घातला. मतदान शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने अहोरात्र झटणाऱ्या यंत्रणेच्या मेहनतीवर पाणी फेरू नये म्हणून पोलीस कमालीचे संयमाने वागल्याचे दिसून आले. त्याचा गैरफायदा घेतल्याचे बजाजनगरातील घटनेवरून समोर आले आहे. बजाजनगरातील अल्फोन्सा शाळेच्या मतदान केंद्रावर जे घडले, ते धक्कादायक आहे. दंगा काबू पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले यांनी या प्रकरणात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज, २१ नोव्हेंबरला एफआयआर नोंदवला आहे. त्यावरून राजू शिंदे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना अरेरावी, उद्धट वागणूक देण्यात आली. अंतरवाली सराटातील पोलिसांसारखी तुमची हालत करू, अशी धमकी देण्यात आली… सर्वच धक्कादायक आहे…
या प्रकरणात दंगा काबू पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद बबनराव एकिलवाले (वय ३९) यांनी तक्रार नोंदवली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने बंदोबस्तासाठी एकिलवाले यांच्यासह ३१ पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला पोलीस नियंत्रण कक्षातून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासोबत गस्तीवर नेमले होते. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी श्री. बगाटे, त्यांचे सहकारी अंमलदार श्री. कवाळे व चालक, एका वाहनात क्युआरटी पथक, एका वाहनात पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ कार्यालयातील पोलीस अंमलदार आणि एकिलवाले यांचे पथक असे सर्व जण बंदोबस्तावर होते. बुधवारी दुपारी साडेचारला सर्वजण भडकल गेट येथे असताना सूचना मिळाली, की वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्फोन्सा इंग्लिश शाळा, बजाजनगर येथील मतदान केंद्राच्या बाहेर १०० मिटरच्या आत मध्ये मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित जमलेला आहे. या जमावाकडून मतदान प्रक्रियेस बाधा येऊ शकते व बुथमधील मतदानाच्या साहित्याचे नुकसान होऊ शकते.
माहिती मिळताच पथक तातडीने अल्फोन्सा शाळेच्या मतदान केंद्रावर पोहोचले. सोबत क्युआरटी पथकातील पोलीस अंमलदार सलमान मोहम्मद पठाण, आकाश घोडके, विलास इंगळे, कृष्णा सावत, योगेश चौधरी असे त्यांच्या वाहनातून आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांच्या कार्यालयीन पोलीस अधिकारी व अंमलदार ज्ञानेश्वर टाकसाळे, अशोक राम पुरी, सहायक फौजदार संजय वाघचौरे, सहायक फौजदार शशिकांत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सखाराम पठाडे हेही त्यांना पुरवण्यात आलेल्या वाहनातून आले. अल्फोन्सा शाळेच्या बाजूने जाणाऱ्या रोडवर मतदान बुथ केंद्राच्या १०० मिटर क्षेत्राच्या आत रस्त्यावर ४०० ते ५०० लोकांचा जमाव जमलेला होता. जमावातील व्यक्ती मतदान करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्यावर थांबवून अडथळा निर्माण करत होते. पोलीस उपायुक्तांनी वाहनात बसवलेल्या लाऊडस्पिकरव्दारे जमावातील लोकांना निघून जाण्यास व रस्ता मोकळा करण्याबाबत सूचना केल्या. गाडीचे सायरन वाजवून गाडीतून खाली उतरले.
पोलीस गाडीतून खाली उतरल्याचे पाहून जमावातील लोक इकडे तिकडे पळू लागले. तेथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांत अडखळून व एकमेकांना धक्का लागून जमावातील काही पुरुष व महिला पडून किरकोळ जखमी झाल्या. तेव्हा तिथे उरलेल्यांपैकी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे व त्यांच्या सोबतचे ४० ते ५० पुरुष व महिला कार्यकर्ते पोलिसांकडे आले. राजू शिंदे यांनी त्यांचे निवडणूक चिन्ह मशाल तसेच त्यांच्यासोबतच्या काही कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचे उपरणे व काहीच्या शर्टला पक्षाचे चिन्ह मशालचा लोगो लावलेले आढळले. निवडणूक प्रचार बंद असल्याने त्यांचे असे वर्तन आक्षेपार्ह व गैरकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ तेथून निघून जाण्यास सांगितले.
त्यावर राजू शिंदे व त्यांचे कार्यकर्ते हे मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल दाखवून मतदान करण्याबाबत सांगत होते. त्यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी राजू शिंदे व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना उद्देशून जमावबंदीचे आदेश आहेत. तुम्ही रस्ता अडवू नका. येथून निघून जा, असे सांगितले. राजू शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बगाटे यांच्या सूचनाकडे दुर्लक्ष केले करत उलट पोलिसांशी अरेरावीची भाषा केली. उध्दट वर्तन करून राजू शिंदे यांनी “अंतरवाली सराटीतील पोलिसांसारखी तुमची हालत करू’, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांच्याविरुध्द आणखी कार्यकर्ते बोलावून घेत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ५ ते ७ मिनिटांमध्ये रस्त्यावरून काढले. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे करत आहेत.